गुडमार' खाल्ल्यानंतर साखरेची चव का लागत नाही ?
साखर किंवा पेढा खाऊन नंतर चहा पिऊन पहा. काय म्हणता हा प्रयोग तुम्ही केला आहे? असे असेल तर नक्कीच तुम्ही तो परत करणार नाही. कारण चहा अगोड लागतो. दुसरी एक गंगत सांगतो. काही खेड्यांमध्ये एक प्रथा आढळते. साप चावलेल्या माणसाला मिरची किंवा कडूनिंबाचा पाला खायला देतात. त्या माणसाने जर मिरचीची चव तिखट वा कडूनिंबाची कडू सांगितली, तर तो बरा होणार असे मानतात व जर चव नाही असे तो म्हणाला, तर तो मरणार असे मानतात. ह्याबद्दल आता माहिती घेऊ.
जिभेमुळे आपल्याला चव कळते. चव कळण्यासाठी जिभेवर स्वादांकूर असतात. या स्वादांकुरावर एखादा पदार्थ सूक्ष्म प्रमाणात जरी ठेवला तरी आपल्याला चव कळते. जिभेच्या कडांना पाठीमागच्या बाजूस व शेंडयाला कडू, तुरट, आंबट, गोड, खारट अशा चवी वेगवेगळ्या प्रमाणात समजतात. स्वादांकुराचे कार्य व्यवस्थित चालले तरच चव समजते.
'गुडमार' ही एक वनस्पती आहे. तिचा पाला खाल्ल्या नंतर चव कळणाऱ्या स्वादांकूरावर परिणाम होतो. हे स्वादांकूर त्यांचे कार्य करू शकत नाहीत. साहजिकच गुडमार खाल्ल्यानंतर साखर गोड लागत नाही. विषारी सापाच्या विषाचा स्वादांकुरांतून चवीची संवेदना मेंदू पर्यंत वाहून नेणाऱ्या मज्जातंतूंवर परिणाम झाल्याने काही विशिष्ट प्रकारचे साप चावल्यास तिखट, कडू चव कळत नाही.
म्हणजे वर सांगितलेल्या खेड्यातील प्रथेत हे वैज्ञानिक तथ्य आहे. पण चव कळत नाही म्हणजे माणूस मरणार, असे मानणे योग्य नाही. सापाच्या विषावरील प्रतिद्रव्य दिल्यास व इतर उपचार मिळाल्यास साप चावलेली व्यक्ती वाचू शकते.
काही वेळा स्वादांकुरांचे कार्य काही प्रमाणात कमी होते किंवा आपण खाल्लेल्या पदार्थामुळे त्यांच्या जाणिवा बोथट होतात. याचे उदाहरण म्हणजे तिखटाचा दुसरा घास पहिल्या घासापेक्षा कमी तिखट लागतो व साखर खाऊन चहा पिल्यास चहा अगोड लागतो.
*डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*
*संकलक - दिपक तरवडे*
Comments