मूत्रसंस्थेत* *मूत्रपिंड,मूत्रवाहिनी, मूत्राशय, इत्यादी ठिकाणी खडे होतात.

*मूत्रसंस्थेत* *मूत्रपिंड,मूत्रवाहिनी, मूत्राशय, इत्यादी ठिकाणी खडे होतात. लघवी म्हणजे पाणी आणि अनेक प्रकारचे क्षार असतात. हे क्षार काही कारणांनी मूत्रमार्गात एखाद्या ठिकाणी जमतात. काही काळाने या क्षारांचा खडा तयार होतो. मूत्रपिंडाचा नरसाळयासारखा भाग,मूत्रवाहिन्या व मूत्राशय यांत कोठेही हे खडे तयार होतात. खडे एकतर आहे तेथेच राहतात किंवा लघवीच्या प्रवाहाबरोबर खाली सरकतात. लघवीतील क्षारांची या खडयांवर रोज पुटे चढून खडे मोठे होत राहतात.*


*कारणे*

मुतखडे होण्याची कारणे अनेक आहेत. पाणी कमी पिण्यामुळे लघवीतील क्षारांचे प्रमाण जास्त होते. म्हणजेच लघवी सौम्य न होता'कडक' होते. यामुळे हे क्षारांचे थर जमू लागतात. काही प्रकारच्या आहारांत, पालेभाज्यांत व जड पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असते. विहिरीचे पाणी, अळू, पालक, टोमॅटो, इत्यादींमधून क्षारांचा जास्त पुरवठा होतो. मूत्रमार्गात कोठेही पू अथवा सूज असल्यास हळूहळू क्षार जमायची क्रिया होते.

कुपोषित लहान मुलांमध्ये 'अ' जीवनसत्त्वाच्या अभावामुळे पेशी मरण्याचे प्रमाण जास्ती असते. मूत्रमार्गात अशा मृत पेशींभोवती क्षार जमायला मदत होते. अशा मुलांना मूत्राशयात खडा होतो. एकूणच 10 ते30 या वयोगटात आणि पुरुषांमध्ये खडा होण्याचे प्रमाण जास्त आहे.

परंतु बऱ्याच वेळा खडा नेमका कशामुळे होतो हे सांगता येत नाही.

खडयांचे आकार व रंगही विविध असतात. मूत्राशयाच्या नरसाळयासारख्या तोंडामध्ये असणारा खडा मोठा झाल्यावर नरसाळयासारखाच आकार घेतो. मूत्रवाहिनीत लांबट खडे होतात,मूत्राशयात तयार होणारे खडे गोलसर असतात.

काही खडयांचा पृष्ठभाग गुळगुळीत असतो तर काहींचा खरबरीत काटेरी. खडा गुळगुळीत असेल तर मूत्रमार्गात बुचासारखा पक्का बसतो. यामुळे तो मार्ग बंद होण्याची शक्यता असते. खडा काटेरी व खरबरीत असेल तर त्यामुळे रक्तस्राव आणि वेदना होते. पण अशा खडयाच्या बाजूने लघवी झिरपू शकत असल्याने लघवीचा मार्ग पूर्णपणे बंद होत नाही हे चांगलेच आहे.

काही खडे क्ष-किरण चित्रात दिसतात, तर काही दिसत नाहीत.

काही खडे जागच्या जागी अडकून वाढत राहतात, तर काही प्रवाहाबरोबर मूत्राशयात येतात किंवा त्यातून बाहेर पडतात.

*मुतखडयाचे दुष्परिणाम*

मुतखडयाचे परिणाम अनेक प्रकारचे असतात.त्याप्रमाणे लक्षणे व चिन्हेही बदलतात.

मूत्रपिंडाच्या गाभ्यातले खडे

काही खडे मूत्रपिंडाच्या गाभ्यामध्ये असतात. हे खडे लहान किंवा मोठे असू शकतात. असे खडे सहसा समजून येत नाहीत. यामुळे सहसा मूत्रपिंडाचे काम बंद पडत नाही.

मूत्रपिंडाच्या तोंडात बसलेले खडे

काही खडे मूत्रपिंडाच्या नरसाळयासारख्या तोंडात बसलेले असतात. या खडयांमुळे लघवी अडेपर्यंत तरी मंद दुखण्यापलीकडे फारसा त्रास होत नाही. कधीकधी त्या ठिकाणी पू होतो. मग त्याबरोबर ताप, उलटया, इत्यादी त्रास होतो.

खडयामुळे लघवीचा मार्ग बंद होत असल्यास त्याचा फुगार येऊन मूत्रपिंडातील पेशींवर दाब येतो. असा फुगार आल्यास मूत्र पिंडाचा आकार वाढतो व कधीकधी तो हाताला लागू शकतो. अशा वेळी मूत्रपिंडाच्या जागी (पुढून किंवा पाठीमागे) दाबल्यावर दुखरेपणा आढळतो. योग्य वेळी निदान व उपचार न झाल्यास त्या बाजूचे मूत्रपिंड कायमचे निकामी होण्याची शक्यता असते.

- मूत्रपिंडातून निसर्गतः खडा खाली दाबण्याचा प्रयत्न झाल्यास कळ येते.

- खडा काटेरी असल्यास रक्तस्राव होतो.

- काही वेळा खडा मोठा होइपर्यंत रुग्णाला काहीच त्रास होत नाही. इतर दुखण्यासाठी पोटाचे क्ष-किरण चित्र किंवा सोनोग्राफी काढल्यास खडे आढळून येतात. मात्र काही वेळा या वेळेपर्यंत ते मूत्रपिंड निकामी झालेले असते.

*मूत्रवाहिनीतले खडे*

मूत्रवाहिनीतल्या खडयांमुळे विशिष्ट लक्षणे दिसतात. एक तर जेव्हा जेव्हा खडा खाली ढकलण्याचा प्रयत्न स्नायू करतात तेव्हा तेव्हा जोराची कळ येते. ही कळ पोटातून मागून खाली घुसते व जांघेकडे किंवा मूत्रनलिकेकडे येते. ही वेदना अत्यंत तीव्र असते. यामुळे रुग्ण पोट दाबून हातपाय दुमडून कुशीवर पडून राहण्याचा प्रयत्न करतो. याबरोबर कधीकधी उलटया होतात. यावेळी लघवीचा नमुना तपासल्यास कधीकधी ती लालसर दिसते. पण रक्तस्रावाचे प्रमाण कमी असल्यास सूक्ष्मदर्शक तपासणीतच कळू शकते. करावी लागते. यात लघवीत रक्ताच्या तांबडया पेशी दिसून येतात. काही वेळाने कळ थांबते, पण ती मधूनमधून किंवा कालांतराने येते.

या खडयामुळे मूत्रमार्ग बंद पडत असेल तर मूत्रपिंडात मूत्र साठून त्याचा फुगार तयार होतो. यावर वेळीच उपचार न झाल्यास मूत्रपिंड निकामी होते.

काही वेळा मूत्रवाहिनीतले खडे मूत्राशयात उतरतात. यानंतर मग पूर्वीप्रमाणे कळ येत नाही. पण यानंतर लघवी अडकण्याचा त्रास सुरू होतो.

*मूत्राशयातले खडे*

मूत्राशयात एकतर स्वतंत्रपणे खडे तयार होतात किंवा मूत्रवाहिनीतून त्यात खडे उतरतात. या खडयांमुळे जंतुदोष होऊन ताप, पोटदुखी, लघवी वारंवार व गढूळ होणे, इत्यादी लक्षणे दिसतात.

खडा मोठा असेल तर तो मूत्रनलिकेच्या तोंडावर येऊन लघवी अडण्याचा प्रसंगही वारंवार येतो. अशा वेळी उकिडवे बसल्यावर लघवी होत नाही (कारण खडा तोंडावर येऊन बसतो) पण कुशीवर किंवा उताणे पडून लघवी मोकळी होऊ शकते. (कारण या स्थितीत खडा तोंडावरून बाजूला पडतो.)

काही खडे बारीक (खर) असतात आणि ते लघवीतून शरीराबाहेर पडतात. अशा वेळी खूप वेदना होते व कधीकधी रक्तस्राव होतो.

*मुतखडे : रोगनिदान*

पोटात दुखण्याची, कळ येण्याची जागा व इतर माहितीवरून मुतखडयाची शंका येते. मात्र निश्चित निदानासाठी लघवीची तपासणी (रक्ताच्या पेशी असणे-नसणे) आवश्यक असते. याबरोबरच पोटाचे क्ष-किरण चित्र, सोनोग्राफी किंवा अधिक तपासण्या कराव्या लागतात.यात खडयाची जागा,आकार नेमके कळू शकते. तसेच याबरोबर आणखी खडे असल्यास तेही कळते. मात्र मूत्रपिंडावर नेमका किती परिणाम झाला आहे हे कळण्यासाठी काही विशेष तपासणी करावी लागते. तसेच रक्ताची तपासणी करून (युरीया, इ.चे प्रमाण) दोन्ही मूत्रपिंडाचे काम किती प्रमाणात चांगले आहे किंवा बिघडले आहे याचा अंदाज घ्यावा लागतो.

मुतखडयाची शंका असल्यास वेळीच डॉक्टरला दाखवावे.

*उपचार*

खडयाची जागा, आकार, संख्या, मूत्रपिंडावरचे दुष्परिणाम, इत्यादी गोष्टींवरून उपचाराचे स्वरूप ठरवता येते. यावर चार प्रमुख पध्दतींनी उपचार करता येतो. 5 मि.मी.पेक्षा लहान खडयासाठी शस्त्रक्रिया लागत नाही.

*भरपूर पाणी पिणे*

या उपायाचा बारीक खडे (5मि.मी.पेक्षा लहान) विरघळून किंवा वाहून जाण्यासाठी उपयोग होतो. मूत्रपिंडाची स्थिती नाजूक झाली असेल तर मात्र हा उपाय योग्य नाही. या पध्दतीने खडे जायला खूप महिने लागू शकतात. काही वेळा खडा पूर्ण न विरघळताहीनुसता लहान झाला तरी निसटून मूत्राशयात किंवा बाहेर पडतो. आयुर्वेद व स्थानिक उपचार पध्दतीत खडे पडण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय सांगितले जातात. अनेक प्रकारच्या वनस्पती (उदा. गोखरू ) व अनेक वनस्पतींपासून तयार केलेल्या आयुर्वेदिक गोळयाही उपलब्ध आहेत.

मुतखडयांचा उपचार आणि प्रतिबंध या दोन्ही दृष्टींनी भरपूर पाणी पिणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

*शस्त्रक्रिया*

खडयांचा आकार, जागा, दुष्परिणाम, इत्यादी लक्षात घेऊन काही वेळा शस्त्रक्रियांचा निर्णय घेतला जातो. मोठया खडयांसाठी किंवा जास्त खडयांसाठी शस्त्रक्रिया हाच योग्य मार्ग आहे. कमी किंवा लहान खडयांसाठी आता आधुनिक तंत्रे उपयुक्त आहेत

*नलिका दुर्बिणीने उपचार*

मूत्राशयात किंवा मूत्रवाहिनीच्या खालच्या भागात असलेले खडे नलिका तपासणीत काढता येतात. यासाठी लघवीच्या मार्गातून नळी घालून खडयापर्यंत हूक (आकडा) नेला जातो. नवीन तंत्राने खडा जागच्या जागी फोडून खाली आणता येतो. हे सर्व उपचार करण्यासाठी एंडोस्कोपी सर्जरीची गरज असते.

*ध्वनिलहरींनी बाहेरून खडे फोडणे ः*

मुतखडा 2 से.मी. पेक्षा लहान असल्यास हे तंत्र वापरता येते. हे एक नवीन तंत्रज्ञान असून खडयाची जागा निश्चित केल्यावर विद्युतप्रवाहाने सूक्ष्म ध्वनिलहरी वापरून खडे जागच्या जागी फोडले जातात. खडयांचा चुरा लघवीबरोबर खाली येतो. ही सोय फारच मर्यादित ठिकाणी उपलब्ध आहे आणि सध्या तरी खूप खर्चीक आहे. मात्र शस्त्रक्रियेचा त्रास यात टाळता येतो.

त्वचेजवळ असल्याने मूत्रपिंडातले आणि वरच्या मूत्रवाहिनीतले लहान खडे छोटया शस्त्रक्रियेद्वारे काढता येतात. याला परक्युटेनिमस तंत्र असे नाव आहे. 2 से.मी.पेक्षा मोठे खडे पण या तंत्राने काढता येतात.

*आयुर्वेद*

मुतखडयांवर आयुर्वेदात अनेक औषधे सांगितली आहेत. मुतखडयांचा त्रास असल्यास एकदा तरी तज्ज्ञाकडून योग्य ती तपासणी करून घेणे आवश्यक आहे. ताबडतोब शस्त्रक्रिया करणे आवश्यक नसल्यास निरनिराळे आयुर्वेदिक उपाय करून पाहता येतील. वरुणादि काथ हे औषध यासाठी उपयुक्त आहे. हे औषध सकाळ सायंकाळ 2-2 चमचे घ्यावे.

एक उपाय म्हणजे पाषाणभेद वनस्पती व गोखरू काटे (सराटे) यांचे समप्रमाणात मिसळलेले चूर्ण दोन ग्रॅम, रोज एक वेळ (सकाळी रिकाम्या पोटी) पाण्याबरोबर द्यावे. त्यानंतर चार-पाच तास तोंडाने काहीही न घेण्याची सूचना द्यावी. याप्रमाणे दीड महिना रोज उपचार करावेत. पाच-सहा महिन्यांनंतर परत एकदा महिनाभर हाच उपाय करावा. हा उपाय लागू पडल्यास लघवीतून खडयाची खर बाहेर पडताना जाणवते. औषध चालू केल्यानंतर आठ-दहा दिवसांत हा परिणाम दिसणे अपेक्षित आहे.

याचबरोबर कुळीथाचा काढा (25 ग्रॅम कुळीथ + 200 मि.ली. पाणी मंद आचेअर उकळून 50 मि.ली द्रव तयार करणे) रोज द्यावा. असे तीन ते सात दिवस देऊन तीन-चार आठवडे थांबून परत 3 ते 7 दिवस हाच उपाय करावा.

पुनर्नवा वनस्पतीही मुतखडयावर उपयुक्तआहे. पुनर्नवा (खापरखुटी,वसूची भाजी) ही पावसाळयापासून होळीपर्यंत ठिकठिकाणी आढळते. या वनस्पतीची मुळासकट बिनतिखट चटणी (50 ग्रॅम) रोज जेवणात असावी. ओली वनस्पती काढून सावलीत वाळवून नंतर वापरता येते.

या उपायांबरोबरच टोमॅटो, कोबी, अळू,, इत्यादी भाज्या जेवणातून वर्ज्य करावा.

 डॉ .श्री. नितिन जाधव .संजीवन चिकित्सक .डोंबिवली. 9892306092.

Comments

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

ॐ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः। सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुःखभाग्भवेत। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥
May all sentient beings be at peace, may no one suffer from illness, May all see what is auspicious, may no one suffer. Om peace, peace, peace.

Total Pageviews