भूक

आजचा विषय: भूक 

भूक लागत नसली तर त्याकडे दुर्लक्ष करणे चांगले नाही. बऱ्याचदा चमचमीत किंवा आवडणारा पदार्थ समोर आला तर तो खाण्याची इच्छा होते, मात्र ही काही खरी भूक नव्हे. उलट भूक नसताना असे काहीतरी खाल्ले तर त्यामुळे पचन बिघडण्याचाच संभव जास्ती असतो. समोर आलेले अन्न खाण्याची इच्छा होणे, नीट भूक लागणे, खाल्लेल्या अन्नाची चव व्यवस्थित समजणे या गोष्टी एकमेकांना पूरक असतात. मात्र कधीतरी असेही दिसते की भूक लागलेली असते; पण खायला घेतले की अन्न जात नाही किंवा तोंडाला चव राहत नाही. हे सर्व त्रास कमी अधिक फरकाने जाठराग्नीशी संबंधित असतात. 

वेळेवारी आणि छान, व्यवस्थित भूक लागणे हे आरोग्याचे सूचक लक्षण आहे. अगोदर सेवन केलेले अन्न पचले, की पुन्हा भूक लागणे स्वाभाविक असते आणि भुकेची संवेदना जाणवल्यानंतरच जेवणे आरोग्यासाठी चांगले असते. मात्र जेवणाची वेळ झाली आहे म्हणून जेवणे हे बरोबर नाही. सध्या मात्र असे करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे असे दिसते. 

बऱ्याचदा चमचमीत किंवा आवडणारा पदार्थ समोर आला तर तो खाण्याची इच्छा होते. मात्र ही काही खरी भूक नव्हे. उलट भूक नसताना असे काहीतरी खाल्ले तर त्यामुळे पचन बिघडण्याचाच संभव जास्ती असतो. समोर आलेले अन्न खाण्याची इच्छा होणे, नीट भूक लागणे, खाल्लेल्या अन्नाची चव व्यवस्थित समजणे या गोष्टी एकमेकांना पूरक असतात. मात्र कधीतरी असेही दिसते की भूक लागलेली असते; पण खायला घेतले की अन्न जात नाही किंवा तोंडाला चव राहत नाही. हे सर्व त्रास कमी अधिक फरकाने जाठराग्नीशी संबंधित असतात. विशेषतः भूकेच्या प्रमाणावरून व स्वरूपावरून अग्नीचे तीन प्रकार करता येतात. 

मंदाग्नी - म्हणजे अग्नीचे काम मंदावल्यामुळे भूक अजिबात न लागणे. सहसा अग्नीवर अतिरिक्त कामाचा बोजा अल्याने तसेच कफदोष वाढल्याने ही अवस्था निर्माण होते. 
तीक्ष्णाग्नी - यात खूप भूक लागते, नुकतेच जेवले असले तरी पुन्हा खाण्याची इच्छा होते. सहसा पित्तदोष वाढल्यामुळे असे होऊ शकते. 
विषमाग्नी - विषम म्हणजे अनियमित. यात कधी भूक लागते, कधी अजिबात खावेसे वाटत नाही. कधी जड अन्नसुद्धा सहजतेने पचते तर कधी साधा, हलके अन्नही पचत नाही. यात बरोबरीने पोटात गुडगुडणे, पोटात गुबारा धरणे, दुखणे यासारखी लक्षणे असतात. 

प्रकृतीचा आणि अग्नीच्या या प्रकारांचा काही प्रमाणात एकमेकांशी संबंध असतो मात्र प्रकृती कोणतीही असली तरी वेळेवारी, नीट भूक लागावी यासाठी पुढील उपाय योजता येतात, 
* भूक लागावी, खाण्याची इच्छा व्हावी यासाठी जेवणाच्या अगोदर आल्याचा छोटा तुकडा थोड्याशा काळ्या मिठाबरोबर खाणे, तसेच सकाळी उठल्यानंतर सुंठ, गूळ व तूप यापासून तयार केलेली लहान सुपारीच्या आकाराची गोळी घेणे चांगले असते. 
* भूक नसली तर काहीतरी चविष्ट खायची इच्छा होते. अशावेळी तेलकट, चमचमीत वगैरे पदार्थांऐवजी आमसुलाचे सार; जिरे, हिंग टाकून तयार केलेले मुगाचे कढण; कढीपत्ता, लसूण, सुंठ, मिरी वगैरे टाकून केलेल्या कढीबरोबर खिचडी असा साधा, हलका पण चविष्ट आहार घेणे चांगले होय. 
*अपचनाची लक्षणे अधूनमधून दिसत असल्यास भाताच्या पहिल्या घासाबरोबर पाव चमचा हिंग्वाष्टक चूर्ण व दोन-तीन थेंब तूप घेणे, किंवा दुपारच्या जेवणानंतर वाटीभर ताजे ताक पाव चमचा हिंग्वाष्टक टाकून घेणे उपयुक्त होय. 
* खावेसे वाटत नाही, गॅसेस होतात, अशावेळी जेवणापूर्वी चमचाभर लिंबाच्या रसात आल्याच्या रसाचे पाच-सहा थेंब व दोन चिमूट सैंधव टाकून घेता येते. 
* तोंडाला चव नसणे, अपचन, गॅसेसचा वारंवार त्रास होणे यावर लसूण, ओवा, हिंग, आले, मिरी, हळद, सुंठ वगैरे मसाले उपयुक्त असतात. रोजच्या स्वयंपाकात या गोष्टींचा समावेश करणे चांगले होय. 
* कोथिंबीर, पुदिना, आले, लसूण, जिरे यापासून तयार केलेली चटणी जेवणाचा सुरवातीला खाल्ली तर चांगली भूक लागते. आले-ओल्या हळदीचे लोणचे, पुदिन्याची चटणी किंवा आवळ्याचे लोणचे जेवणाच्या मधेमधे तोंडी लावणे चांगले. 
* भूक फारच कमी असेल तर खाववेल तेवढी साळीच्या लाह्यांची तूप-जिरे, आले, सैंधवासह तयार केलेली पेज खाता येते किंवा जेवढी भूक असेल तेवढ्या प्रमाणात तांदळाचा मऊ-पातळ भात, पातळ मुगाची खिचडी, जुने लिंबाचे लोणचे अशी आहारयोजना करता येते. 
* जेवणानंतर ओवा, आले, सैंधव मीठ वगैरे टाकून ताजे ताक पिण्याने पचन नीट होण्यास तसेच भूक लागण्यास मदत मिळते. 
* प्यायचे पाणी 20 मिनिटे उकळवलेले असणे व शक्‍यतो गरमच पिणे हेसुद्धा भूक नीट लागण्यास मदत करणारे असते, निदान जेवताना तरी असे अगोदर उकळलेले गरम पाणी पिणे अधिक गुणकारी होय. 
* आठवड्यातून एक दिवस रात्री पूर्ण लंघन करणे हेसुद्धा पचन सुधारण्यासाठी आणि पर्यायाने वेळेवर भूक लागण्यासाठी सहायक असते. 
मंदाग्नी तसेच विषमाग्नी असणाऱ्यांसाठी हिंग्वाष्टक चूर्ण, लवणभास्कर चूर्ण, शंखवटी वगैरे औषधे घेण्याचा उपयोग होतो. 
खूप भूक लागणाऱ्यांनी अवेळी भूक लागेल तेव्हा साळीच्या लाह्या, राजगीऱ्याची वडी, मूगाचा लाडू यासारख्या पित्तशामक गोष्टी खाणे, फारच भूक असली तर साबुदाण्याची खीर किंवा भरपूर तूप घालून मुगाची खिचडी घेता येते. 

भूक न लागण्यामागे अपचनाव्यतिरिक्त इतरही अनेक कारणे असू शकतात. बरेच दिवस भूक लागत नसली, बरोबरीने वजन बरेचसे कमी होत असले, खरोखरच काहीही खावेसे वाटत नसले तर ते एखाद्या अवघड विकाराचे निदर्शकही असू शकते. उदाहरणार्थ काविळीमधे भूक लागत नाही, यकृत, किडनी या अवयवांशी संबंधित आजारांमध्ये भूक कमी होते, थायरॉइड ग्रंथीचे काम खालावले तरी भूक मंदावते, टीबी, एड्‌स, पोटाचा, आतड्याचा कर्करोग, तीव्र स्वरूपाचे नैराश्‍य किंवा इतर मानसिक विकार यामधेही भूक कमी झालेली दिसते. केमोथेरपी, प्रतिजैविकांचा दीर्घकालीन वापर, तीव्र वेदनाशामक औषधांचा सातत्याने वापर यामुळेसुद्धा भूक कमी होते. नशा आणणाऱ्या द्रव्यांच्या आहारी जाण्यानेही भूक लागेनाशी होते. फारच कमालीचे दुःख, चिंता, निराशा यामुळेसुद्धा भुकेची संवेदना हरपते. वय जसजसे वाढते, तसतशी भूक कमी होणे स्वाभाविक असते. गरोदरपणात विशेषतः पहिल्या तीन महिन्यांत काही स्त्रियांना भूक लागत नाही. 

एकंदर पाहता भूक लागत नसली तर त्याकडे दुर्लक्ष करणे चांगले नाही. वर उल्लेखलेले घरगुती उपचार तसेच खाण्यापिण्यात बदल करूनही जर अधिकाधिक एका आठवड्यात फारसा फरक पडला नाही तर मात्र तज्ज्ञांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्यायलाच हवे. 

 डॉ .श्री .नितिन जाधव .संजीवन चिकित्सक. डोंबिवली. 9892306092.

Comments

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

ॐ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः। सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुःखभाग्भवेत। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥
May all sentient beings be at peace, may no one suffer from illness, May all see what is auspicious, may no one suffer. Om peace, peace, peace.

Total Pageviews