Skip to main content

Posts

वेदाक्षर घडे ज्यासी । तो बोलिजे पुण्यरासी । म्हणौन वेदीं सामर्थ्यासी । काय उणे ।।

।। दास-वाणी ।।  वेदाक्षर घडे ज्यासी ।  तो बोलिजे पुण्यरासी ।  म्हणौन वेदीं सामर्थ्यासी ।  काय उणे ।।  वेदशास्त्रपुराण ।  भाग्यें जालियां श्रवण ।  तेणें होईजे पावन ।  हें बोलती साधु ।।  ।। जय जय रघुवीर समर्थ ।।   दासबोध : ०७/०६/३०-३१  पूर्वसुकृताने वेदांचा अभ्यास ज्याला घडतो  तो पुण्याच्या राशीच्या राशी जोडतो. वेदांमधील एक अक्षर जरी कानावर पडले, तरी मोठेच पुण्य मिळते. ही वेदांची ताकद आहे. चार वेद, सहा शास्त्रे आणि अठरा पुराणे यांचे महद् भाग्याने जर श्रवण घडले, तर श्रोता पावन पवित्र होऊन जातो. असे साधुसंत सांगतात जे स्वत:  वेदाभ्यासानेच परिपूर्ण झालेले असतात. स्वत: मुक्ती प्राप्त असूनही ते संत बद्ध म्हणजे बांधलेल्या जीवांना मार्गदर्शक ठरतात. बद्धमुक्त निरूपण समास.

जयास द्वैत भासलें । ते मन उन्मन जाले । द्वैताअद्वैताचें तुटले । अनुसंधान ।।

।। दास-वाणी ।।  जयास द्वैत भासलें ।  ते मन उन्मन जाले ।  द्वैताअद्वैताचें तुटले ।  अनुसंधान ।।  येवं द्वैत आणि अद्वैत ।  होये वृत्तीचा संकेत ।  वृत्ती जालिया निवृत्त ।  द्वैत कैचे ।।  ।। जय जय रघुवीर समर्थ ।।   दासबोध : ०७/०५/१२-१३  अंत:करणामधे मी आणि परमेश्वर वेगवेगळे आहोत. ही भावना म्हणजे द्वैत. नवविधा भक्तीमधून मनाचे एकदा उन्मन झाले की परमेश्वराशी एकरूपता साधते. हे अद्वैत. अहं ब्रह्मास्मि ची अनुभूती द्वैत आणि अद्वैत दोन्ही मावळून टाकते. एकूण काय वेगळेपण आणि एकरूपता  या दोन्ही अंत:करणवृत्तीच्या अवस्था आहेत. कठोर प्रदीर्घ साधनेअंती ही वृत्तीच जर  निवृत्त झाली तर द्वैताचा अनुभव  नेमका कोण आणि कसा घेणार ?  त्यामुळे द्वैत शिल्लकच राहणार नाही.  उरेल ते एकमेवाद्वितीय परब्रह्म.  म्हणजेच अद्वैत !  द्वैतकल्पनानिरसन समास.

तयामधेंचि असिजे । परी तयास नेणिजे । उमजे भास नुमजे । परब्रह्म ते ।।

।। दास-वाणी ।।  तयामधेंचि असिजे ।  परी तयास नेणिजे ।  उमजे भास नुमजे ।  परब्रह्म ते ।।  आकाशामधें आभाळ ।  तेणें आकाश वाटे डहुळ ।  परी तें मिथ्या निवळ ।  आकाशचि असे ।।  ।। जय जय रघुवीर समर्थ ।।   दासबोध : ०७/०४/०९-१०  खरे तर सर्व चराचर सृष्टीमधे परब्रह्म व्यापून असते. जीवसृष्टी ही ब्रह्मामधेच आकंठ बुडालेली असूनही एकही जीव परब्रह्माला पूर्णत: जाणत नाही. कठोर साधनेअंती कधीकधी ते उमजल्याचा भास होतो. परंतु अनुभूती शिवाय परब्रह्म कोणी जाणले  असे म्हणता येत नाही. आकाशामधे ढग दाटून आल्यावर ते गढुळ झालय, किंवा मळलय असे वाटू शकते. ढग निघून गेले की स्वच्छ निरभ्र आकाशच दिसते. परब्रह्मावरही मायेचे आभरण आले की मायिक  जीवसृष्टीमुळे ते झाकोळल्यासारखे वाटते. जीवसृष्टीचा निरास झाला की मूळ परब्रह्म साधकाला स्वच्छ, स्पष्ट दिसू लागते.  त्या निरभ्र आकाशासारखेच.  तेच ते निर्मल असे विमलब्रह्म !  विमलब्रह्मनिरूपण समास.

शब्दब्रह्म तें शाब्दिक । अनुभवेविण माईक । शाश्वताचा विवेक । तेथे नाही ।।

।। दास-वाणी ।।  शब्दब्रह्म तें शाब्दिक ।  अनुभवेविण माईक ।  शाश्वताचा विवेक ।  तेथे नाही ।। जे क्षर ना अक्षर ।  तेथें कैंचें मीतिकाक्षर ।  शाश्वताचा विचार ।  तेथेहि न दिसे ।।  ।। जय जय रघुवीर समर्थ ।।   दासबोध : ०७/०३/२४-२५  प्रदीर्घ अभ्यासानंतर शब्दांमधून समजते ते शब्दब्रह्म. अखंड साधनेअंती त्याची प्रत्यक्ष अनुभूती येत नाही तोपर्यंत हे मायेच्या क्षेत्रामधे मोडते. शाश्वत चिरंतन आत्मा शाब्दिक प्रवचन किंवा श्रवण  करून अनुभवाला येत नाही. म्हणून चौदा ब्रह्मांपैकी पहिले शब्दब्रह्म हे मायिकच !  दुसरे मीतिकाक्षर म्हणजे एकाक्षरी ब्रह्म. ते ॐ कार रूपी मानले जाते. प्रणव किंवा ॐकार ही परब्रह्माची शब्दरूप ओळख. क्षर म्हणजे नाशिवंत. अक्षर म्हणजे नाश नाही ते. परब्रह्म क्षर ना अक्षर. तेथे एकाक्षर प्रणव तरी कसा आणता येईल. हा ॐ सुद्धा शाब्दिक आहे. म्हणून दुसरे मीतिकाक्षर ब्रह्म देखील मायिकच !  चतुर्दशब्रह्मनिरूपण समास.

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Blogs

Total Pageviews