।। दास-वाणी ।।
बाष्कळामधें बैसों नये ।
उद्धटासीं तंडो नये ।
आपणाकरितां खंडो नये ।
समाधान जनाचे ।।
प्रसंग जाणावा नेटका ।
बहुतांसी जाझू घेऊं नका ।
खरे असताचि नासका ।
फड होतो ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : १९/०२/०९-११
उथळ बडबडया लोकांमधे आपली उठबस नसावी.
सभेमधे अनेक लोक बोलत असतात.
त्यामधे उद्धटांचा जोर जास्त असतो.
आपला मुद्दा अशा लोकांना कधीच पटवून देण्याचा
प्रयत्न करू नये. निव्वळ अहंकाराची लढाई होते.
आपली शांती तर ढळतेच शिवाय सभेचीही
शिस्त मोडते.
वादविवाद हे सभेमधे होतच राहतात.
आपण तानमान पाहून बोलावे.
एकाच वेळी अनेकांशी वाद घालाल तर
तुमचा मुद्दा बरोबर असूनही केवळ झुंडशाहीच्या
बळावर तो फेटाळला जाऊ शकतो.
शिवाय सभाही भंगते.
त्याचेही खापर आपल्यावरच फुटते.
विवरणनिरूपण समास.
Comments