।। दास-वाणी ।।
संशयरहित ज्ञान ।
तेंचि साधूचे लक्षण ।
सिद्धाआंगी संशय हीन ।
लागेल कैसा ।।
कर्ममार्ग संशये भरला ।
साधनीं संशये कालवला ।
सर्वांमधे संशये भरला ।
साधु तो नि:संदेह ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०५/१०/१३-१४
बरोबर की चूक, योग्य की अयोग्य असा
मनामधे सतत विकल्प येणे म्हणजे संशय.
साधु हा परिपूर्ण असल्याने त्याचे ज्ञान
अर्थातच संदेहरहित असते.
सिद्धपुरूषाच्या मनामधे अपूर्णता, अस्पष्टता,
संदिग्धता अशा हीन संशयी गोष्टींना थाराच नसतो.
प्रदीर्घ साधनेअंती सिद्धत्वाला पोहोचलेल्या
योगी पुरूषांना परब्रह्म हे करतलामलकवत्
म्हणजे करतलावर घेतलेल्या डोंगरी आवळयाप्रमाणे
चारी बाजूंनी स्वच्छ दिसते.
कर्मकांडातील विविधतेने मनात संशय निर्माण होतो.
भक्तिमार्गामधेही श्रवण का कीर्तन, नामस्मरण की पादसेवन
अर्चन की वंदन? दास्य की आत्मनिवेदन
असे असंख्य विकल्प असल्याने नेमका निश्चय
असा होतच नाही.
असा सर्वच गोष्टींमधे गोंधऴ उडालेला दिसतो.
सिद्ध मात्र आत्मानुभवाने यापलीकडे केव्हाच
जाऊन पोहोचलेला असतो.
संशयातीत म्हणजे नि:संदेह बनतो.
बद्धाची सर्वोच्च विकसित अवस्था म्हणजे सिद्ध !
सिद्धलक्षण समास.
Comments